सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यात पडली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर वाळवा तालुक्यातील केदारवाडी फाट्याजवळ वारणा दूध संघाचा टँकर सोडवून कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर सोडून दिलं.


यावेळी टँकरच्या काचा आणि हेडलाईट फोडून टँकरचंही नुकसान करण्यात आलं. रविवारी सायंकाळपासून दूध आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार सांगली जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

अपडेट :

नवी मुंबई : उद्या मुंबई आणि उपनगरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी वारणाकडून तयारी, वारणा दूध महासंघाकडे 3 दिवस पुरेल एवढा साठा, उद्या मुंबईला होणाऱ्या दूध पुरवठ्याची पॅकिंगही पूर्ण, वारणा मुंबईत दररोज 2 लाख लिटर दूध पुरवठा करते

नाशिक : जिल्ह्यातील प्रसिद्ध नस्तनपूर येथील शनी महाराजांना दुधाचा अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा राजू शेट्टींच्या आंदोलनाला एक दिवसाचा पाठिंबा, उद्या एक दिवस गोकुळ दूध संघ दुधाचं संकलन थांबवणार, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

नेमक्या मागण्या काय?

दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.

पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.

या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.

दूध उत्पादकांना संरक्षण देणार : जानकर

काहीही झालं तरी मुंबईचा दूध पुरवठा कमी होऊ देणार नाही, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत, असं पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.