कझान (रशिया) : फ्रान्सने अर्जेंटिनाचा कडवा संघर्ष मोडीत काढून विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जगभरच्या फुटबॉल रसिकांना सात गोलची पर्वणी पाहायला मिळाली.


फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना सामन्यातील सात गोल्सनी आणि उभय संघांच्या फुटबॉल कौशल्यानं जगभरच्या क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.

रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं गतवेळच्या उपविजेत्या अर्जेंटिनाचा कडवा संघर्ष ४-३ असा मोडून काढला. पण या सामन्यात सरशी ही फुटबॉलची झाली.

या सामन्यात कर्णधार अॅन्टॉईन ग्रिझमननं तेराव्या मिनिटाला फ्रान्सचं खातं उघडलं. त्यानं पेनल्टीवर गोलची नोंद केली. मग एंजल डी मारियानं ४१व्या मिनिटाला अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली.

उत्तरार्धात ४८व्या मिनिटाला  मेसीच्या शॉटवर मर्काडोनं अर्जेंटिनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर या सामन्यावर फ्रान्सनं वर्चस्व गाजवलं. पॅवार्डनं ५७व्या मिनिटाला फ्रान्सला २-२ अशी बरोबरी साधून दिली. मग किलियान एमबापेनं चार मिनिटांत दोन गोल डागून फ्रान्सची आघाडी ४-२ अशी वाढवली.

अर्जेंटिनाच्या सर्जियो अॅग्वेरोनं एन्जुरी टाईममध्ये गोल झळकावून फ्रान्सची आघाडी ३-४ अशी कमी केली. पण तोवर खूप उशीर झाला होता. फ्रान्सनं ४-३ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.