सेंट पीटर्सबर्ग : फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतला पहिला मुकाबला आज रात्री साडेअकरा वाजता खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ह्यूगो लॉरिसच्या बलाढ्य फ्रान्सची गाठ एडन हॅझार्डच्या बेल्जियमशी पडणार आहे. फ्रान्स आणि बेल्जियम हे या विश्वचषकातले तुल्यबळ संघ असून या दोन्ही संघांना यंदा विश्वचषकासाठी पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून फायनलमध्ये कोण धडक मारणार, याविषयी फुटबॉलरसिकांमध्ये उत्सुकता आहे.

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं उरुग्वेचा तर बेल्जियमनं ब्राझिलचा पराभव करत उपांत्य फेरत धडक मारली होती. त्यामुळे आता हे दोन्ही तुल्यबळ संघ अंतिम फेरीच्या तिकीटासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

फ्रान्स

यंदाच्या विश्वचषकात फ्रान्सचा संघ सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. साखळी फेरीत अ गटात अव्वल स्थान गाठत फ्रान्सनं बाद फेरीत प्रवेश केला.  त्यानंतर बाद फेरीतले दोन्ही सामने जिंकत 2006 नंतर पहिल्यांदाच फ्रान्सचा संघ उपांत्य फेरीत दाखल झालाय.

यंदाच्या विश्वचषकातील फ्रान्स प्रवास -

  • पहिला सामना - फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी मात

  • दुसरा सामना - फ्रान्सचा पेरुवर 1-0 असा विजय

  • तिसरा सामना - फ्रान्सचा डेन्मार्कविरुद्धचा सामना बरोबरीत


उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं मेसीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला 4-3 अशा फरकानं हरवलं तर उपांत्यपूर्व सामन्यात सुआरेझच्या उरुग्वेचा 2-0 ने धुव्वा उडवला.

बेल्जियम

एडन हॅझार्डचा बेल्जियमचा संघ यंदाच्या विश्वचषकातला टॉप फेव्हरेट संघ आहे. बेल्जियमनं आपल्या त्याच लौकीकाला साजेसा खेळ करत विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. तेही जपान आणि बलाढ्य ब्राझिलसारख्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून.

यंदाच्या विश्वचषकातील बेल्जियमचा प्रवास -

  • पहिला सामना - बेल्जियमची पनामावर 3-0 अशी मात

  • दुसरा सामना - बेल्जियमकडून ट्युनिशियाचा 5-2 असा फडशा

  • तिसरा सामना - बलाढ्य इंग्लंडवर 1-0 असा विजय


साखळी फेरीत बेल्जियमनं ग गटातल्या तिनही सामन्यांवर आपलं वर्चस्व गाजवलं. त्यानंतर जपानविरुद्ध उपउपांत्यपूर्व सामन्यात 0-2 अशा पिछाडीवरुन 3-2 असा शानदार विजय साजरा केला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमनं नेमारच्या ब्राझिलचंही आव्हान 2-0 असं मोडीत काढलं. त्यामुळे आता उपांत्य सामन्यात बेल्जियमच्या फौजेसमोर फ्रान्सचं आव्हान उभं ठाकलंय.

फ्रान्सची मदार एमबापेवर

फ्रान्सनं यंदाच्या विश्वचषकात पाच सामन्यांत नऊ गोल नोंदवले आहेत. तर आठ गोल स्वीकारलेयत. अँटॉयन ग्रिझमन आणि किलियानं एमबापे या फ्रान्सच्या शिलेदारांनी प्रत्येकी तीन गोल नोंदवून फ्रान्सच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बेल्जियमविरुद्धच्या लढतीत फ्रान्सची मदार प्रामुख्यान ग्रिझमन आणि एमबापे यांच्यावर असेल. याशिवाय कर्णधार आणि गोलरक्षक ह्युगो लॉरेस, पॉल पोग्बा, बेंजामिन पॅवार्ड यांची कामगिरीही महत्वाची ठरेल.

बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूची चमकदार कामगिरी 

बेल्जियमनंही यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करताना पाच सामन्यांत सर्वाधिक 14 गोल झळकावलेयत. आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला मात्र बेल्जियमविरुद्ध केवळ पाच गोल डागता आले आहेत. बेल्जियमच्या या यशाचं द्यावं लागेल ते प्रामुख्यानं रोमेलू लुकाकू आणि गोलरक्षक थिबो कोर्टुआला. 25 वर्षांच्या रोमेलू लुकाकूनं आतापर्यंत विश्वचषकातल्या चार सामन्यात चार गोलची नोंद केली आहे. याशिवाय गोलरक्षक कोर्टुआच्या भक्कम बचावामुळं प्रतिस्पर्धी संघाला गोल डागण्यासाठी फारशी संधीच मिळालीच नाहीये. कर्णधार एडन हॅझार्ड, फेलायनी, केव्हिन डी ब्रॉयना, चॅडली सारख्या शिलेदारांमुळे बेल्जियमचं आक्रमण आणखीनच धारदार झालं आहे.

फ्रान्स आणि बेल्जियमच्या लढतींचा लेखाजोखा

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये फ्रान्स आणि बेल्जियम संघांमध्ये 63 लढती खेळवण्यात आल्या आहेत. त्यात 24 वेळा फ्रान्सनं तर 30 वेळा बेल्जियमनं बाजी मारलीये आणि 19 सामने अनिर्णित राहिले आहेत. पण फिफा विश्वचषकाच्या इतिहासात मात्र फ्रान्स बेल्जियमपेक्षा नेहमी वरचढ ठरलाय. उभय संघांमध्ये विश्वचषकाच्या रणांगणात खेळवण्यात आलेल्या आजवरच्या सहा सामन्यांमध्ये फ्रान्सनं चार वेळा बाजी मारली आहे तर केवळ एक सामना बेल्जियमनं जिंकलाय.

एकूणच काय तर सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममध्ये रंगणारी ही उपांत्यफेरीची लढाई तितकीच तुल्यबळ होईल यात शंका नाही. त्यामुळे या सामन्यात बलाढ्या फ्रान्सची फौज बेल्जियमवर मात करुन तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठतेय, की बेल्जियमचा संघ ही लढाई जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या दिशेने आगेकूच करतोय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरावं.