मॉस्को : एडन हॅझार्डच्या बेल्जियमने हॅरी केनच्या इंग्लंडचा 2-0 असा धुव्वा उडवला. त्यामुळे रशियातल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमला तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला.

बेल्जियम आणि इंग्लंड संघांना या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात हार स्वीकारावी लागली होती. पराभूत झालेल्या दोन उपांत्य संघांमधला तिसऱ्या क्रमांकाचा सामना सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर खेळवण्यात आला.

या सामन्यात नासेर चॅडलीच्या क्रॉसवर थॉमस म्युनियरनं चौथ्याच मिनिटाला बेल्जियमचं खातं उघडलं. मग केविन डी ब्रॉयनानं दिलेल्या पासवर एडन हॅझार्डनं 82 व्या मिनिटाला बेल्जियमचा दुसरा गोल लगावला. त्याच्या या गोलमुळे सामना बेल्जियमच्या बाजूनं झुकवला.

फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया असा सामना रंगणार आहे. मॉस्कोतल्या ल्युझनिकी स्टेडियमवर या विश्वचषकाचा अंतिम सामना आज रात्री साडेआठ वाजता खेळवण्यात येईल.

फ्रान्स हा तुलनेत बलाढ्य असला तर क्रोएशिया धोकादायक संघ आहे. त्यामुळे 2018 सालचा विश्वचषक जिंकणार कोण, याची उत्सुकता अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहणार आहे.