मोस्को (रशिया) : फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रोएशियानं फायनलमध्ये धडक मारून नवा इतिहास रचला आहे. क्रोएशियानं उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून भल्याभल्यांचा अंदाज खोटा ठरवलाय. आता 15 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात क्रोएशिला बलाढ्य फ्रान्ससोबत मुकाबला करावा लागणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंडने आक्रमक खेळ केला. इंग्लंडच्या किरन ट्रिपियरनं फ्री किकवर गोल करून, पाचव्या मिनिटालाच इंग्लंडचं खातं उघडलं. ट्रीपीयरने हा गोल करून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात क्रोएशियाला एकही गोल करता आला नाही.

उत्तरार्धात मात्र क्रोएशियाने इंग्लंडवर जोरदार आक्रमण केले. वरलासकोच्या क्रॉसवर पेरिसिचनं क्रोएशियाला 68 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. इंग्लंड-क्रोएशियातली बरोबरीची ही कोंडी निर्धारित वेळेत फुटू शकली नाही. त्यामुळं सामना 15-15 मिनिटांच्या जादा वेळेत खेळवण्यात आला.

पेरिसिचनं 109 व्या मिनिटाला हेडरवर दिलेल्या पासवर मारियो मानझुकिचनं क्रोएशियाचा दुसरा गोल लगावला. याच गोलनं क्रोएशियाला २-१ अशा विजयासह फायनलचं तिकीट मिळवून दिलं.