मोस्को : फिफा विश्वचषकात क्रोएशियानं लायनेल मेसीच्या अर्जेंटिनाला जबरदस्त धक्का दिला आहे. क्रोएशियानं अर्जेंटिनाचा 3-0 असा धुव्वा उडवला आहे. या विजयासह क्रोएशियानं विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक मारली. क्रोएशियानं सलामीच्या सामन्यात नायजेरियाचा 2-0 असा पराभव केला होता.
या सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली. अर्जेंटिनाची सगळी भिस्त मेसीवर होती. मेसी फॉर्मात परतेल आणि संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना होती. उलट क्रोएशियानेच सर्वोत्तम खेळ करत अर्जेंटिनाच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
अर्जेंटिनाच्या आघाडीच्या फळीला क्रोएशियाच्या बचाव फळीने उत्तम पद्धतीने रोखले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. सामन्यात गोलरक्षक विल्फ्रेडो कॅबलेरोच्या घोडचुकीनं अर्जेंटिनाचा घात केला. 53 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोलकीपरकडून बॉल पास करताना चूक झाली. या संधीचे क्रोएशियाच्या रेबिचने सोने करत संघासाठी पहिला गोल मारला.
क्रोएशियाच्या या एका गोलमुळे सामन्याचे चित्रच पालटले. या गोलने अर्जेंटिनाला धक्का बसला. या धक्क्यातून अर्जेंटिनाचा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. क्रोएशियाच्या लुका मॉडरिचनं 80 व्या मिनिटाला तर इव्हान रॅकिटिचनं 90 व्या मिनिटाला गोल करत सामन्यातील आपला विजय निश्चित केला.
अर्जेंटिनावर 3-0 ने मात करत क्रोएशियाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले. तर अर्जेंटिनाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
FIFA World Cup 2018 : मेसीच्या अर्जेंटिनाचा क्रोएशियाकडून धुव्वा, 3-0 ने मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2018 08:24 AM (IST)
अर्जेंटिनाची सगळी भिस्त मेसीवर होती. मेसी फॉर्मात परतेल आणि संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना होती.
सुपरस्टार लियोनेल मेस्सी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -