FIFA World Cup 2018 : बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2018 10:03 AM (IST)
अखेरच्या क्षणात बेल्जियमच्या नॅसेर चॅडलीनं अफलातून गोल करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बेल्जियमने बलाढ्या अशा जपानचा 3-2 ने पराभव केला.
मोस्को ( रशिया ) : अखेरच्या क्षणात बेल्जियमच्या नॅसेर चॅडलीनं अफलातून गोल करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बेल्जियमने बलाढ्या अशा जपानचा 3-2 ने पराभव केला. बेल्जियम आणि जपान संघांमधला सामना हा रशियातल्या फिफा विश्वचषकातला आजवरचा सर्वोत्तम सामना ठरला आहे. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाला एकही गोल मारता आला नाही. पण मध्यंतरानंतर तिसऱ्याच मिनिटाला जपानच्या गेन्की हारागुचीनं गोल मारत खातं उघडलं. त्यानंतर काही मिनिटातच ताकाशी इनुईनं गोल करत जपानला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. या दोनही गोलनं खडबडून जाग्या झालेल्या बेल्जियमनं आपला खेळ उंचावला. बेल्जियमच्या वर्तोनघननं 69 व्या मिनिटाला आणि फेलायनीनं 74 व्या मिनिटाला गोल नोंदवून बेल्जियमला बरोबरी साधून दिली. त्यानंतर एन्जुरी टाईममध्ये अखेरच्या क्षणात नॅसेर चॅडलीनं अफलातून गोल झळकावला. या गोलनं बेल्जियमला 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून दिला.