मोस्को (रशिया) : फुटबॉल विश्वचषकात बलाढ्य समजला जाणाऱ्या ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आले आहे. बेल्जियमनं ब्राझीलचं कडवं आव्हान 2-1 असं मोडीत काढून, फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बेल्जियमची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची गेल्या 32 वर्षांमधली ही दुसरी वेळ आहे. ब्राझीलच्या फर्नांडिन्होनं तेराव्या मिनिटाला केलेला स्वयंगोल ब्राझीलला महागात पडला.


हा सामना कझान शहरात खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ केला गेला. ब्राझीलच्या फर्नांडिन्होनं तेराव्या मिनिटाला स्वयंगोल करून बेल्जियमचं खातं उघडलं. त्यानंतर दहा मिनिटातच बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूनं दिलेल्या अफलातून पासवर केविन डी ब्रॉयनानं 33 व्या मिनिटाला तितकाच कमालीचा गोल लगावला. पण ब्राझीलला मध्यंतरापर्यंत एकही गोल करता आला नाही.

मध्यांतरानंतर ब्राझीलनं सातत्यानं हल्ले करून बरोबरी साधण्याचा नेटानं प्रयत्न केला.  ब्राझीलच्या रेनोटो ऑगोस्टोने 78 व्या मिनिटाला पहिला गोल केला. सामन्याचा 90 मिनिटांचा खेळ संपला तेव्हा बेल्जियमच्या संघाने 2-1 ने आघाडी ठेवली होती. त्यानंतर 5 मिनिटांचा अधिकचा टाइम देण्यात आला. परंतु ब्राझीलला मिळालेल्या अधिकच्या वेळेत सुद्धा गोल करता आला नाही.

1986  साली बेल्जियमनं उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर यंदा बेल्जियमनं ब्राझीलला हरवून उपांत्य फेरी गाठली. तर ब्राझीलच्या पराभवामुळे नेमारच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. ब्राझीलही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे यंदा फिफा वर्ल्डकप कोण जिंकणार याबद्दलची उत्सुक्ता मात्र अधिकच वाढली आहे.