रशिया : लायनेल मेसीच्या अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातल्या सलामीच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावं लागलं. ड गटातल्या या सामन्यात आईसलँडनं बलाढ्य अर्जेंटिनाला १-१ असं बरोबरीत रोखलं.

या सामन्यात पंचांनी ६३ व्या मिनिटाला दिलेल्या पेनल्टीवर गोल डागण्याची लायनेल मेसीला सोनेरी संधी होती. पण आईसलँडच्या गोलरक्षकानं मेसीचा तो प्रयत्न हाणून पाडला. त्याआधी या सामन्यात सर्जिओ अॅग्वेरोनं एकोणिसाव्या मिनिटाला अर्जेंटिनाचं खातं उघडलं. पण आल्फ्रेड फिनबोगासननं काही मिनिटांत गोल डागून आईसलँडला बरोबरी साधून दिली.

हॅन्स हालडोरसन अनपेक्षित नायक

आईसलँडनं अर्जेंटिनाला बरोबरीत रोखलेल्या सामन्यात त्यांचा गोलरक्षक हॅन्स हालडोरसन या अनपेक्षित नायक ठरला. हालडोरसननं ६३व्या मिनिटाला साक्षात लायनेल मेसीची पेनल्टी कीक थोपवली. त्यामुळं आईसलँडला हा सामना १-१ असा बरोबरीत सोडवता आला.