मोस्को (रशिया) : यंदाच्या फिफा विश्वचषकात बलाढ्य 16 संघांमध्ये बाद फेरीची ठिणगी पडणार आहे. त्याच बाद फेरीची सुरुवात आजपासून होत आहे. अर्जेन्टिना आणि फ्रान्स हे दोन बलाढ्य संघ आज एकमेकांशी दोन हात करतील. अन्टोयनी ग्रीझमन आणि लायनल मेसीच्या फौजांमधला हा सामना रशियातल्या कझान अरिना स्टेडियमवर रंगणार आहे.


फ्रान्सने विश्वचषकाच्या ‘क’ गटात अव्वल स्थान गाठत बाद फेरी गाठली आहे. साखळी सामन्यात फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाला 2-1 तर पेरुला 1-0 अशा गोलफरकानं हरवलं. तर डेन्मार्कविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला.

बाद फेरीत मेसीच्या अर्जेन्टिनाला आपला करिश्मा दाखवता आला नसला तरी अखेरच्या क्षणी त्यांनी बाद फेरीतलं आपलं आव्हान कायम राखले आहे. ‘ड’ गटातल्या पहिल्या दोन्ही सामन्यात अर्जेन्टिनाचा संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला आहे. पण तिसऱ्या आणि निर्णायक साखळी सामन्यात मार्कोस रोहोच्या गोलमुळे अर्जेन्टिनाने नायजेरीयावर 2-1 अशी मात करत बाद फेरी गाठली.

यंदाच्या विश्वचषकाआधी फ्रान्स आणि अर्जेन्टिना हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण दोन्ही संघांकडून साखळी फेरीत त्या दर्जाचा खेळ पहायला मिळाला नाही. फ्रान्स आणि अर्जेन्टिना या दोन्ही संघांनी तीन सामन्यात मिळून आतापर्यंत केवळ तीनच गोल केले आहेत. त्यामुळे बाद फेरीत दोन्ही संघांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा फुटबॉल रसिकांना राहील.

उपउपांत्यपूर्व फेरीच्या या निर्णायक सामन्यात फ्रान्सची मदार असेल ती स्टार फुटबॉलवीर अँटॉयनी ग्रीझमनवर. याशिवाय फ्रान्सच्या ताफ्यात कर्णधार ह्यूगो लॉरेस, कायलीन एमबाप्पे, पॉल पोग्बा आणि ल्युकास हर्नांडेजयांची कामगिरीही महत्वाची ठरेल.

या सामन्यात अर्जेन्टिनाला मात्र कर्णधार लायनेल मेसीकडून मोठी अपेक्षा राहील. मेसीला यंदाच्या विश्वचषकात तीन सामन्यात केवळ एकच गोल नोंदवता आलाय. त्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात मेसीच्या कामगिरीकडे फुटबॉलरसिकांचं लक्ष राहील.

विश्वचषकाच्या इतिहासात फ्रान्स आणि अर्जेन्टिना दोन वेळा आमनेसामने आले आहेत. यात दोन्ही वेळा अर्जेन्टिनानेच बाजी मारलीये. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात बाद फेरीच्या पहिल्याच लढतीत फ्रान्सचा संघ अर्जेन्टिनाविरुद्ध पहिला विजय नोंदवणार की अर्जेन्टिना फ्रान्सला विश्वचषकात तिसऱ्यांदा धूळ चारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.