मॉस्को : लायनेल मेसीच्या अर्जेंटिनाने नायजेरियाचा कडवा संघर्ष 2-1 असा मोडित काढून 'फिफा विश्वचषका'च्या बाद फेरीत धडक मारली. अर्जेंटिनाच्या या विजयात कर्णधार मेसी आणि मार्कोस रोहोनं गोल डागून निर्णायक भूमिका बजावली.


विश्वचषकाच्या 'ड' गटात अर्जेंटिनाला पहिल्यांदा आईसलँडनं 1-1 असं बरोबरीत रोखलं होतं. त्यानंतर क्रोएशियाने अर्जेंटिनाचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे बाद फेरीच्या तिकीटासाठी अर्जेंटिनाला नायजेरियाला हरवणं अनिवार्य होतं.

मेसीने 14 व्या मिनिटाला गोल करुन अर्जेंटिनाचं खातं उघडलं. मात्र व्हिक्टर मोझेसने 51 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर नायजेरियाला बरोबरी साधून दिली. सामना संपायला चार मिनिटं असताना मार्कोस रोहोने अर्जेंटिनाचा दुसरा आणि निर्णायक गोल मारला.

फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या आणखी दोन सामन्यांचं चित्र आज स्पष्ट झालं आहे. या विश्वचचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीला 30 जूनपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक दिवशी दोन असे सलग चार दिवस उपउपांत्यपूर्व फेरीचे आठ सामने खेळवण्यात येतील.

30 जूनला पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात लायनेल मेसीच्या अर्जेंटिनाची गाठ फ्रान्सशी पडेल. त्यानंतर एक जुलैच्या दुसऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात क्रोएशियाचा मुकाबला डेन्मार्कशी होईल.