मुंबई : अर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉल लायनेल मेसीवरील बंदी फिफाने मागे घेतली आहे. त्यामुळे फिफा विश्वचषक पात्रता फेरीआधी अर्जेन्टिनाला नवं बळ मिळालं आहे.
मैदानावरील पंचांना उद्देशून शिवीगाळ केल्याप्रकरणी मेसीवर मार्च महिन्यात चार आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंदी आणि 10 हजार स्विस फ्रँकच्या दंडाची कारवाई करण्यात आली होती. त्याविरोधात मेसीनं अपील केलं होतं.
मेसीवर चार सामन्यांची बंदी घालण्याइतका पुरावा उपलब्ध नाही, असा निर्वाळा फिफाच्या अपील कमिटीने दिला. त्यामुळं अर्जेन्टिनाला दिलासा मिळाला आहे.
बंदीच्या कारवाईमुळे मेसी बोलिव्हियाविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यात खेळू शकला नव्हता, त्याच्या गैरहजेरीत अर्जेन्टिनाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेत दक्षिण अमेरिकेच्या गटात सध्या पाचव्या स्थानावर आहे. अर्जेन्टिनाला आता पुढच्या सामन्यात उरुग्वेचा मुकाबला करायचा आहे.