पंढरपूर:  मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही. धनगर समाजाने मतं दिली असती, तर आज मी केंद्रात मंत्री असतो, असं वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलं. ते पंढरपुरात बोलत होते.


याशिवाय धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले महादेव जानकर?

"मी मंत्री झालोय ते केवळ धनगर आरक्षणामुळे नाही, तुम्ही मला त्यात अडकवू नका. आय एम नॉट लीडर ओन्ली धनगर कम्युनिटी. (प्रश्न - तुमची ओळख कुणामुळे-कशामुळे समाजामुळे झाली ना)  - बिलकुल नाही. मी राष्ट्रीय समाज म्हणून….. माझा पहिला आमदार कोण आहे..  बाळासाहेब पाटील हा कुठल्या जातीचा आहे.? मला धनगरांनी मतं दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो, आज राज्यात मंत्री नसतो. बारामती मतदार संघात धनगराच्या गावात मी खाली आलोया, अन ब्राह्मणाच्या आळीला 70 हजार लीड घेतलंय, मराठ्यांच्या आळीला लीड घेतलंय.

मला पक्ष काढल्यानंतर सर्व समाजाला सोबत घेऊन जावं लागतं. एकट्या जातीवर होत नसतं".



धनगर, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न

यावेळी जानकरांनी धनगर आरक्षणासोबतच, मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केलं.

धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमचे केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीत मी मोदींना धनगर आरक्षणाबाबत विनंती केली, असं जानकर म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षण रखडलं, असा आरोप त्यांनी केला.  आरक्षणाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे घिसाडघाई करून काही फायदा नाही, असं जानकरांनी नमूद केलं.

राजू शेट्टी-सदाभाऊंच्या वादावर भाष्य

यावेळी जानकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. मी मध्यस्थी करुन सर्वांना एकत्र आणणार असल्याचं जानकर म्हणाले.