मॉस्को (रशिया): अर्जेंटिनाचा लायनल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. फुटबॉलविश्वाचे हे दोन तारे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरून मावळतीकडे झुकत असताना त्याच क्षिजितावर उगवलाय एक नवा तारा. त्याचं नाव किलियान एमबापे. फ्रान्सच्या अर्जेंटिनावरच्या विजयाचा शिल्पकार किलियान एमबापे.

फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत एमबापेनंच दोन गोल डागून अर्जेंटिनाला रशियातून गाशा गुंडाळायला लावला. फ्रान्स आणि अर्जेंटिना संघांमधला सामना 2-2 असा बरोबरीत असताना, एमबापेनं अवघ्या चार मिनिटांत दोन गोल झळकावून त्या सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या याच कामगिरीनं फ्रान्सला उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवून दिलं. आणि अर्जेंटिनाचं लायनल मेसीचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर अधुरंच राहिलं.

अवघ्या 19 वर्षांचा एमबापे

रशियातल्या विश्वचषकानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलला दिलेला नवा नायक अवघा एकोणीस वर्षांचा आहे. पण या वयात तो जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनला आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या चार सामन्यांत एमबापेनं तीन गोल डागले आहेत.

अर्जेंटिनाविरुद्धच्या दोन गोलनी एमबापेला महान फुटबॉलवीर पेले यांच्या पंक्तीत बसवलंय. पेले यांनी 1958 साली वयाच्या सतराव्या वर्षी विश्वचषकाच्या एकाच सामन्यात दोन गोल करण्याचा पराक्रम केला होता. पेले यांच्यानंतर एकाच विश्वचषक सामन्यात दोन गोल झळकावणारा तो दुसरा तरुण फुटबॉलपटू ठरला. साक्षात पेले यांच्याशी झालेली ही तुलना आपल्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याचं एमबापेनं म्हटलं आहे.



वयाच्या दुसऱ्या वर्षापासून फुटबॉल

किलियान एमबापेचा जन्म पॅरिसमधला. तो घडलाही पॅरिसमध्येच. त्याचे वडील विल्फ्रेड एमबापे मूळचे कॅमेरूनचे. एमबापेची आई फायजा या मूळच्या हॅण्डबॉलपटू. पण त्याही अल्जेरियातून येऊन पॅरिसमध्ये स्थायिक झालेल्या. किलियान एमबापेला त्या दोघांकडून खेळाचा वारसा उपजतच लाभला होता. त्यानं वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच फुटबॉलचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. त्याच मेहनतीनं आज फ्रान्सला किलियान एमबापे नावाचा उत्तम फुटबॉलपटू दिला आहे.

17 व्या वर्षी पदार्पण

किलियान एमबापेनं व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केलं ते वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी. फ्रान्सच्या मोनॅको क्लबनं 2015 साली त्याला करारबद्ध केलं होतं. त्यानंतर नेमार खेळत असलेल्या पॅरिस सेंट जर्मेन क्लबनं त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. आजवरच्या कारकीर्दीत व्यावसायिक फुटबॉलमध्ये एमबापेच्या नावावर 33 गोलची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही त्यानं 14 गोल डागले आहेत.

बेडरुममध्ये रोनाल्डोच पोस्टर

फ्रान्सचा हा युवा फुटबॉलवीर पोर्तुगालचा कर्णधार आणि स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला आपला आदर्श मानतो. रोनाल्डोचा चाहता असलेल्या एमबापेनं त्याच्या बेडरुममध्ये रोनाल्डोचेच पोस्टर लावले आहेत. आपल्यालाही एक दिवस रोनाल्डोइतकाच मोठा फुटबॉलवीर व्हायचं आहे, असा त्याचा निश्चय आहे.



सर्व मानधन समाजकार्याला

किलियान एमबापे हा केवळ फुटबॉलपटू म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणूनही किती मोठा आहे याचीही रशियात प्रचीती आली. रशियातल्या विश्वचषकात फ्रान्सकडून खेळताना मिळणारं सारं मानधन एमबापे सामाजिक कार्यासाठी दान करणार आहे. देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला पैशांची गरज नाही, असं त्याचं ठाम मत आहे. त्यामुळं प्रत्येक सामन्यागणिक मिळणारी 20 हजार युरोची रक्कम तो सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे.

भारतीय चलनात एमबापेला एका सामन्यासाठी अंदाजे सोळा लाख रुपये मिळतात. एवढी रक्कम एकहाती दान करणारा एमबापे हा खरोखरच जगावेगळा फुटबॉलवीर ठरावा

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये लायनल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लुईस सुआरेझ, सर्जिओ रॅमोस, आंद्रे इनेस्टा, ल्युका मॉडरिचसारख्या खेळाडूंनी आता वयाची तिशी ओलांडली आहे. पुढच्या काही वर्षात हे फुटबॉलवीर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतील. त्यामुळं किलियान एमबापे, हॅरी केन, रोमेलू लुकाकूसारख्या युवा शिलेदारांवर फुटबॉलचं भविष्य अवलंबून राहिल.