राजकोट : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात रोजकोटमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू महेंद्र सिंह धोनीच्या संथ फलंदाजीवरही क्रिकेटप्रेमींना नाराजी व्यक्त केली. मात्र याच सामन्यात त्याने स्वतःची विकेट वाचवली, तो क्षण पाहून क्रिकेट चाहते त्याचं कौतुक करायलाही विसरले नाहीत.
धोनीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना त्याने पुन्हा एकदा उत्तर दिलं. मिशेल सेंटनरच्या गोलंदाजीवर धोनीने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू मिस होऊन विकेटकीपरच्या हातात गेला. विकेटकीपर स्टम्पिंग करणार तेवढ्यातच धोनीने स्वतःला स्ट्रेच केलं आणि स्वतःची विकेट वाचवली.
https://vimeo.com/241316135
अगोदर हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्यात आला. सर्वांची धाकधुक वाढली होती. मात्र धोनी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला होता. त्यानंतर स्टम्प किंगची स्टम्पिंग करणं शक्य नाही, असं म्हणत धोनीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 20 षटकांत 197 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. न्यूझीलंडने भारताला 20 षटकांत सात बाद 156 धावांत रोखलं. न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने 34 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून भारतीय फलंदाजीचा कणा मोडला.
विराट कोहली आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 56 धावांच्या भागिदारीने टीम इंडियाच्या आव्हानात धुगधुगी निर्माण केली होती. पण विराट बाद झाला आणि भारताच्या विजयाची आशा संपुष्टात आली. विराटने ४२ चेंडूंत 8 चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली.