खरं तर पहिल्या डावात भारताची अवस्था 7 बाद 92 अशी झाली होती. त्यावेळी अष्टपैलू हार्दिक पंड्याने आफ्रिकन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 93 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळेच भारताने 200 धावांचा टप्पा ओलांडला.
यावेळी पंड्याला भुवनेश्वर कुमारने उत्तम साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली.
भारताच्या 7 विकेट्स झटपट गेल्या असताना, आठव्या विकेटसाठी आफ्रिकन गोलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यावेळी आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने पंड्याला बाद करुन, आफ्रिकेला मोठं यश मिळवून दिलं.
या विकेटनंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीने सुटकेचा निश्वास सोडला. ड्यू प्लेसीने खुश होत रबाडाकडे धाव घेतली आणि त्याच्या माथ्याचं चुंबन घेतलं.
इतकंच नाही तर ड्यू प्लेसीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
“तुम्ही जेव्हा नंबर वन गोलंदाज बनता, तेव्हा तुमच्यावर असंच प्रेम केलं जातं. वेल डन रबाडा”, असं ड्युप्लेसीने लिहिलं आहे.
ड्युप्लेसी रबाडाच्या कपाळाचं चुंबन घेत असल्याचं पाहून अनेकांनी कमेंट केली.
ड्युपेलीसच्या या पोस्टवर रबाडानेही कमेंट केली. ‘माझी गर्लफ्रेंड तक्रार करत होती’
रबाडाने ही कमेंट मस्करीत की खरंच केली याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. आयसीसीनेही गुरुवारी हा फोटो ट्विट करुन ‘ड्युप्लेसीने नंबर वन गोलंदाजाचं कौतुक केलं’ असं म्हटलं आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवार 13 जानेवारीपासून सुरु होणार आहे.