उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्मभेदापलिकडे पाहण्याची दिलेली दृष्टी उस्मानाबादेतील चिमुरडीने प्रत्यक्षात उतरवली आहे. जिजाबाईंची हुबेहूब वेशभूषा साकारणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनीने स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवला आहे.
उस्मानाबादमधील नूतन शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत 20 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यामध्ये जेबा जहिर तांबोळी या मुस्लिम विद्यार्थिनीचाही समावेश होता.
जेबाने जिजाऊंची वेशभूषा साकारली होती. या वेशभूषेत जेबा इतकी सुंदर दिसत होती की, तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. साहजिकच जेबाचा या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत पहिला क्रमांक आला.
स्वराज्य स्थापन करताना शिवरायांनी सर्वधर्मीयांना आपलंसं केलं, ही शिकवण तांबोळी कुटुंबाने अंगिकारल्याचं पाहायला मिळतं. जिजाऊंसारख्या विचाराची समाजाला गरज असल्याचं मत जेबाची आई शमिम तांबोळी यांनी व्यक्त केलं.