नवी दिल्ली: 29 वर्षीय माजी क्रिकेटरनं युवा क्रिकेटरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.


सौरभ भामरीनं यानं अनेक राज्यस्तरीय सामने खेळले आहेत. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यानं अनेक युवा खेळाडूंवर आपली छाप पाडली. त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचं आमिष दाखवू त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी उत्तरप्रदेशमधील सौरभला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मागील महिन्यापासूनच सौरभला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. पण त्यावेळी तो आमचा हाती लागला नव्हता. पण सोमवारी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली.'

'तो युवा खेळाडूंना क्लब मॅचसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचं आमिष दाखवायचा आणि खेळाडूंना खोटा व्हिसाही द्यायचा. त्याने प्रत्येक खेळाडूकडून 5 ते 20 लाख रुपये घेतले आहे.' अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपले ऑस्ट्रेलिया बोर्डाशी चांगले संबंध असल्याची बतावणी करत सौरभ युवा खेळाडूंकडून लाखो रुपये उकळायचा. याप्रकरणी सध्या त्याची पोलीस चौकशी सुरु आहे. दिल्लीतील ऋषभ त्यागी याने केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं.