पॅरिस: ह्यूगो लॉरिसचा फ्रान्स की, बास्टियन श्वाईनस्टायगरची जर्मनी... युरो कपचा दुसरा उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीत खेळण्याचा मान कोण मिळवणार, या प्रश्नाचं उत्तर शुक्रवारी भल्या पहाटे मिळेल.

 

या सामन्याच्या निमित्तानं फ्रान्स आणि जर्मनी ही युरोपियन फुटबॉलमधली दोन शक्तीस्थानं आमनेसामने येतील. त्या दोन संघांमध्ये फ्रान्सचं पारडं किंचित जड मानलं जात आहे. कारण युरो कपच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं आईसलँडवर 5-2 असा मोठा विजय मिळवला होता. आणि त्या मोठ्या विजयानं फ्रान्सचं मनोधैर्य खूपच उंचावलेलं आहे. फ्रान्सच्या ऑलिव्हियर जिरूड, अॅन्टॉईन ग्रिझमन आणि दिमित्री पायेट या तिघांना त्या सामन्यात गोल करता आला होता. त्याउलट जर्मनीला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी इटालीशी कठोर संघर्ष करावा लागला होता. त्या सामन्याचा निकाल अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला होता. सदर सामन्यात जर्मनीच्या काही शिलेदारांना दुखापती झाल्या, तर काही शिलेदारांचं निलंबन झालं तरीही, बास्टियन श्वाईनस्टायगरची ही फौज आत्मविश्वासानं मैदानात उतरेल.

 

फ्रान्सच्या दृष्टीनं जमेची आणखी एक बाजू म्हणून त्यांना घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी मिळणार आहे. फ्रान्सचा संघ सलग नऊ सामन्यांमध्ये अपराजित असून, जर्मनीनं गेल्या सहा सामन्यांमध्ये हार स्वीकारलेली नाही.