युरो कपमध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी, मैदानावर फेकले जळते फटाके
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2016 06:45 PM (IST)
युरो कपमध्ये मैदानावरच्या खेळापेक्षा मैदानाबाहेरची हुल्लडबाजीच जास्त चर्चेत आहे. शुक्रवारी क्रोएशिया आणि चेक रिपब्लिकमधल्या युरो कपच्या सामन्यात चाहत्यांनी मैदानावर फटाके फेकले. त्यामुळं जवळपास चार मिनिटं खेळ थांबवण्यात आला. हे फटाके दूर करताना मैदानावरचा एक अटेंडंट जखमी झाला. क्रोएशियन चाहत्यांवर हे फटके फेकल्याचा आरोप असून युएफानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात इंग्लंड आणि रशियाच्या चाहत्यांमध्ये झालेल्या दंगलीनंतर युएफानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. खरं तर नोव्हेंबर महिन्या पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये आणिबाणी लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारानं स्टेडियम्सच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. चाहत्यांनी मैदानात फटाके फेकले, तेव्हा क्रोएशियाचा संघ सामन्यात 2-1नं आघाडीवर होता. पण अतिरिक्त वेळेत टॉमस नेसिडनं गोल करून चेक रिपब्लिकला बरोबरी साधून दिली.