रहस्यपट पाहताना प्रेक्षकाचा थिएटरमध्येच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2016 03:48 PM (IST)
तिरुवन्नमलाई : हॉलिवूडमधील गाजलेला रहस्यपट 'द कॉन्ज्युरिंग'चा सिक्वेल अर्थात 'कॉन्ज्युरिंग 2' पाहताना एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तमिळनाडूमधील तिरुवन्नमलाईमध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा थिएटरमध्येच मृत्यू ओढावला. तिरुवन्नमलाईतील श्री बालसुब्रमणियर थिएटरमध्ये आंध्र प्रदेशातील दोन व्यक्ती गुरुवारी 'कॉन्ज्युरिंग 2' चित्रपटाचा लेट नाईट शो पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना एकाला छातीदुखीचा त्रास जाणवू लागला. काहीच क्षणात त्याची शुद्धही हरपली. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं होतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सोबतच्या व्यक्तीला सांगितलं. मात्र मृतदेहासह तो परागंदा झाल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिस परिसरातील रिक्षाचालक आणि लॉजमालकांकडे चौकशी करत असून प्रकरणाचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.