पॅरिस : आईसलॅण्डचा 5-2 असा धुव्वा उडवून यजमान फ्रान्सने युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत फ्रान्ससमोर वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीचं आव्हान असेल.

 

 

स्टेड द फ्रान्समध्ये झालेल्या या सामन्यात फ्रान्सने अगदी सुरुवातीपासूनच आपलं वर्चस्व गाजवलं. फ्रान्सकडून ऑलिव्हियर जिरुडने 12व्या मिनिटाला गोल करून फ्रान्सचं खातं उघडलं. मग पॉल पोग्बाने 19व्या मिनिटाला दुसरा आणि दिमित्री पायेटने 42व्या मिनिटाला तिसरा गोल डागून फ्रान्सची आघाडी 3-0 अशी वाढवली. अँटोनियो ग्रिझमनने 45व्या मिनिटाला गोल करून फ्रान्सला मध्यंतरापर्यंत 4-0 अशी आघाडी मिळवून दिली.

 

इटलीला नमवून जर्मनी युरो कपच्या उपांत्य फेरीत


मग उत्तरार्धात सिगथॉरसननं 56व्या मिनिटाला आईसलॅण्डसाठी पहिला गोल केला. पण ऑलिव्हियर जिरुडने 59व्या मिनिटाला सामन्यातला आपला दुसरा गोल झळकावून फ्रान्सची आघाडी 5-1 अशी वाढवली.  आईसलॅण्डसाठी जार्नसननं 84व्या मिनिटाला दुसरा गोल डागला.

 

 

त्याआधी वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीने इटलीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 6-5 असा सनसनाटी विजय मिळवून युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विश्वचषक आणि युरो कपच्या इतिहासात जर्मनीने इटलीवर मिळवलेला हा आजवरचा पहिलाच विजय ठरला.