लंडन : इंग्लंडनं बांगलादेशच्या 306 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिली. ज्यो रूटचं नाबाद शतक इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरलं. त्यानं सलामीच्या अॅलेक्स हेल्ससोबत 159 धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या डावाचा पाया रचला.


रूटनं कर्णधार इऑन मॉर्गनच्या साथीनं 143 धावांची अभेद्य भागीदारी करून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून ज्यो रूटनं 129 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 133 धावांची खेळी उभारली.

इऑन मॉर्गननं 61 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह 75 धावांची खेळी केली. त्याआधी अॅलेक्स हेल्सचं शतक पाच धावांनी हुकलं. त्यानं 86 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 95 धावांची खेळी केली.

त्याआधी, शतकवीर तमिम इक्बाल आणि मुशफिकुर रहिमनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 166 धावांच्या भागिदारीनं बांगलादेशला या सामन्यात सहा बाद 305 धावांचा डोंगर उभारून दिला होता. तमिम इक्बालनं 142 चेंडूंत 12 चौकार आणि तीन षटकारांसह 128 धावांची खेळी उभारली. मुशफिकुर रहिमनं 72 चेंडूंमधली 79 धावांची खेळी आठ चौकारांनी सजवली.