लॉर्ड्स (इंग्लंड): मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन सध्या बराच चर्चेत आहे. वडिलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी अर्जुन सध्या इंग्लंडमध्ये कसून सराव करत आहे. एवढंच नव्हे तर थेट इंग्लंड संघासोबत तो सराव शिबिरात सहभागी झाला. याचवेळी अर्जुनच्या एका वेगवान चेंडूवर इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेयरस्टो दुखापतग्रस्त झाला.
डेली मेलच्या वृत्तानुसार, द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ नेट प्रॅक्टिस करण्यासाठी मैदानात उतरला होता. याचवेळी अर्जुनही त्यांच्यासोबत सहभागी झाला होता. अर्जुन नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी त्याच्यासमोर फलंदाजीसाठी जॉनी बेयरस्टो आला. तेव्हा अर्जुननं टाकलेला एक वेगवान यॉर्कर थेट त्याच्या अंगठ्यावर जाऊन आदळला आणि बेयरस्टोला मैदानाच सोडावं लागलं.
दरम्यान, मैदान सोडावं लागलं तरी बेयरस्टोची दुखापत जास्त गंभीर नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत त्याचा समावेश असणार आहे.
आजपासून (गुरुवार) इंग्लंड आणि द. आफ्रिका यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली कसोटी लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे.