मुंबई : कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत शिवसेना सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता 'ढोलनाद' करणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली असली, तरी अद्याप प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पैसेच आले नाहीत. त्यामुळे ज्याप्रकारे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारात बँकेचे अधिकारी वसुलीसाठी येतात, तसेच आता शेतकऱ्यांसाठी शिवसेना त्वरित कर्जमुक्तीसाठी बँकांच्या दारात ढोल वाजवणार आहे.
प्रत्येक जिल्हा बँकेच्या नोटीस बोर्डवर शेतकऱ्यांची यादी लावून, त्यांना तात्काळ पैसे देऊन कर्जमुक्त करण्यासाठी बँकांच्या दारातच शिवसेनेकडून ढोल वाजवलं जाणार आहे.
सत्तेत सहभागी असणारी शिवेसना पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेले भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेत असूनही कायम सरकारविरोधात भूमिका घेत शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरली. मात्र, कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शिवसेनेने आपला विरोध सोडला नाही. आता कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून शिवसेना आक्रमक झाली आहे.