या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 405 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं असून, इंग्लंडला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी 318 धावा कराव्या लागणार आहेत. विराट कोहलीच्या टीम इंडियाला ही कसोटी जिंकायची, तर अजूनही आठ विकेट्स घेण्याचं आव्हान आहे.
दरम्यान, अॅलेस्टर कूक आणि हसीब हमीद या सलामीच्या जोडीने दुसऱ्या डावातही जबाबदारीने फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचून भारतीय फिरकी गोलंदाजांना यशासाठी संघर्ष करायला लावला.
अश्विनने हमीदला 25 धावांवर पायचीत केलं. पण कूकने अर्धशतक झळकावलं. त्याने चार चौकारांसह 54 धावांची खेळी उभारली. अखेर जाडेजाने इंग्लंडच्या कर्णधाराला माघारी धाडलं.
जयंत आणि शमीच्या भागीदारीने भारताला सावरलं
इंग्लंडच्या इनिंग अगोदर जयंत यादव आणि मोहम्मद शमीने अखेरच्या विकेटसाठी केलेल्या 38 धावांच्या धडाकेबाज भागीदारीने विशाखापट्टणम कसोटीत भारताला दुसऱ्या डावात 204 धावांची मजल मारून दिली.
टीम इंडियाने पहिल्या डावात घेतलेल्या 200 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचं कठीण आव्हान उभं राहिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आदल्या दिवशीच्या 3 बाद 98 धावांवरून आज सकाळी भारताचा दुसरा डाव पुढे सुरू केला. पण इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर भारताचा दुसरा डाव नऊ बाद 166 असा कोसळला होता. त्या परिस्थितीत जयंत आणि शमीनं केलेल्या भागिदारीनं भारताला सावरलं.