उस्मानाबाद : पुण्यात रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे एका नवजात बाळाला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रुबी हॉल क्लिनीकमधील घटना ही सरकारच्या निर्णयामुळे आहे. तसंच सरकारच्या सांगण्यात आणि वास्तवात खूप फरक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


मोदी सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अयोग्य आहे, त्यामुळे हा निर्णय मोदींना परत घ्यावा लागेल, असं ओवेसींनी पुण्यात सांगितलं. "मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर रुग्णालयात जुन्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. देशात नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 हून अधिक बळी गेले आहेत. त्यामुळे मोदींनी नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यावा." असं ओवेसींनी सांगितलं.

सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येणार नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येणार आहे, अशी टीकाही ओवेसींनी केली आहे. नोटाबंदीमुळे भारताचा विकासदर घसरेल आणि चीन भारताच्या पुढे निघून जाईल अशी भीतीही ओवेसींनी व्यक्त केली.

नोटाबंदीचा त्रास गरिबांना

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना विशेषत:  गरिबांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अनेकांची लग्न रखडली आहेत, तर अनेकांची लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. जगात नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. नोटाबंदीमुळे काश्मीरमध्ये शांतता आली या गोष्टीत तथ्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काळा पैसेवाल्यांवर कारवाई करा

काळा पैसेवाल्यांची यादी सरकारकडे आहे, पण सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे पुढील सात महिने एटीएममध्ये पैसे येणार नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे, असं सांगत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

इतर पक्षांचे खासदार बँकांसमोर रांगा लावतात, पण भाजपाचे खासदार रांगेत दिसत नाहीत असंही ते म्हणाले.