लंडन : इंग्लंडने न्यूझीलंडचा 87 धावांनी धुव्वा उडवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट बुक केलं आहे. इंग्लंडचा हा गटनिहाय साखळीत सलग दुसरा विजय ठरला. इंग्लंडने सलामीच्या सामन्यात बांगलादेशवर मात केली होती.
कार्डिफच्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावांचं आव्हान दिलं होतं. पण न्यूझीलंडला त्या आव्हानाचा पाठलाग झेपला नाही. कर्णधार केन विल्यमसनने 87 धावांची कमालीची खेळी करुनही न्यूझीलंडचा डाव 223 धावांत आटोपला.
इंग्लंडकडून लियाम प्लन्केटने 4, तर जेक बॉल आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी अॅलेक्स हेल्सने 56, ज्यो रूटने 64, बेन स्टोक्सने 48 आणि जोस बटलरने नाबाद 61 धावांची खेळी उभारुन इंग्लंडला सर्व बाद 310 धावांची मजल मारून दिली होती.