बर्मिंगहॅम : एजबॅस्टन कसोटीत भारत आणि इंग्लंड यांच्यात विजयासाठी अटीतटीची लढत होणार आहे. भारताला विजयासाठी 84 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला विजयासाठी पाच विकेट्सची गरज आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये मोठी चुरस आहे.
अजून दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या भारताकडे शिल्लक असले तरी खरी मदार कर्णधार विराट कोहलीवरच असेल. कारण, पहिल्या डावात त्याच्याच शतकी (149) खेळीने भारताचा डाव सावरला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर विराटला बाद करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणतो, की विराटला अगोदर स्वप्नातच बाद करावं लागेल.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अँडरसन पत्रकारांशी बोलत होता. ''आज आम्ही जाऊन झोपू आणि स्वप्न पाहू, की उद्या खेळायला गेल्या गेल्या विराट बाद होईल,'' असं अँडरसन म्हणाला.
अँडरसन आणि विराट यांच्यातला संघर्ष जुना आहे. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात अँडरसनने विराटला खेळपट्टीवर टिकू दिलं नव्हतं. मात्र यावेळी विराटने अँडरसनचा मोठ्या धैर्याने सामना करत त्याला आपल्यावर वरचढ ठरु दिलं नाही. त्यामुळेच आता इंग्लंडच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढली आहे.
''कसोटी जिंकण्यासाठी पाच विकेट लवकरात लवकर घ्याव्या लागतील, नाहीतर भारतीय फलंदाज 84 धावा सहज करतील. आम्ही सुरुवातीच्या 15 ते 20 षटकांमध्ये जीव ओतून खेळू. सकाळी भारतीय संघाला कोणतीही संधी देणार नाहीत. कारण, सामना अत्यंत रोमांचक ठिकाणी आहे. जिंकण्यासाठी आम्हाला काही तरी खास करावं लागेल,'' असं अँडरसन म्हणाला.