मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि फक्त भारतच नाही, तर जगभरात चर्चांना सुरुवात झाली. उत्साहाच्या भरात यूएईमधल्या एका ऑनलाईन न्यूज एजन्सीने धोनी ऐवजी सुशांत सिंग राजपूतचा फोटो टाकला आणि हाच मुद्दा धरत सेहवागने नेहमीप्रमाणे ट्विटरवर फिरकी घेतली.


एमिरेट्स247.कॉम या ऑनलाईन न्यूज एजन्सीने धोनीच्या राजीनाम्याच्या वृत्तासोबत फोटो देताना घोळ घातला. उत्साहाच्या भरात रिअल लाईफ धोनी ऐवजी रील लाईफमध्ये म्हणजेच 'एमएस धोनी' चित्रपटात त्याची भूमिका साकारणाऱ्या सुशांत सिंग राजपूतचा फोटो पोस्ट केला. अर्थात ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली.

सध्या ट्विटरवर ज्याचा दरारा आहे, त्या विरेंद्र सेहवागने हा मुद्दा हेरत विनोदांची फवारणी केली. एमिरेट्स न्यूजला टॅग करत असा ट्वीट केला. मी तुमच्यासोबत विमान प्रवास करतोय, असा टोला हाणत सेहवागने त्याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला. 'मला आशा आहे, तुम्ही माझ्याऐवजी याला विमानात प्रवेश नाही देणार' असा तिरकस निशाणा सेहवागने लगावला.

https://twitter.com/virendersehwag/status/817731613236883457
एमिरेट्स न्यूज एजन्सीला टॅग करुनही विरुने केलेली तिरकस कमेंट 'एमिरेट्स एअरलाईन्स'ला मात्र झेपली नाही. कदाचित सेहवागच्या ट्वीट्सची सवय नसल्याने एमिरेट्स एअरलाईन्सने त्याचं स्वागतच केलं. सेहवागचा (खरा) फोटो टाकत, आमचा घोळ होणार नाही सोबत फ्लाईट घेण्यास उत्सुक आहोत, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं.

https://twitter.com/emirates/status/817961911627251713