जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेत अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी आहेत. कुठे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची रिक्तपदे, कुठे इमारतींचे प्रश्न तर कुठे सेवा– सुविधांविषयक तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाण आरोग्य यंत्रणेविषयी ग्रामस्थ नाराजी व्यक्त करताना दिसतात. मात्र, राज्य सरकारने ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी काही चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आगामी काळात खान्देशातील ग्रामीण आरोग्य सुविधा सुधारण्याची शक्यता आहे. राज्य सरकार नव्याने ७४ आरोग्य उपकेंद्र, २० प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय, दोन जिल्हा रुग्णालय, चार स्त्री रुग्णालय व सहा ट्रॉमा केअर युनिट अशा १११ नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देत आहे. त्यासाठी १,३३२ पदे नव्याने निर्माण केली आहेत. नव्याने निर्माण होणाऱ्या आरोग्य संस्थांमध्ये ७४ आरोग्य उपकेंद्र आहेत. त्यात नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात काही उपकेंद्र सुरू होतील. त्यासाठी आरोग्य सेवक, एएनएम, अंशकालीन स्त्री परिचर अशी २२२ नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. यासोबत राज्यात २० ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्यात येत असून यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. सर्वाधिक १२ प्राथमिक आरोग्य केंद्र हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहेत. त्यासाठी एकूण २४० पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील मंदाणे येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय नंदुरबार व धुळे येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे. जळगाव शहरात या रुग्णालयाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. धुळे येथील १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी व तेथील दहा विशेषोपचार कक्षासाठी पद निर्मित्ती करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयाची संख्या ३०० खाटांवरून ४०० खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ४८ पदे निर्माण केली जाणार आहेत. नवनिर्मित १,३३२ जागांमध्ये गट-अ दर्जाचे २६७ वैद्यकीय अधिकारी असून उर्वरित १०६५ इतर पदे आहेत. जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मध्यंतरी केला. त्यांनी काही रिक्त पदे मंजुरीसाठी थेट आरोग्यमंत्र्यांशी संपर्क केला. मात्र, आता आरोग्य मंत्रालयाने सर्वच ठिकाणच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू केली आहे. अलिकडे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जळगावला येवून गेले. त्यांनाही मंत्री महाजन व माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी आरोग्य यंत्रणेतील अडचणी सोडविण्याची विनंती केली. जळगाव येथील जिल्हा रुग्णालयाचा विस्तार, स्त्री रुग्णालयाचे बांधकाम रेंगाळले आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचे मंत्री पाटील यांनी मान्य केले. नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने मध्यंतरी स्वच्छता विषयक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. तेथील सुसज्ज महिला कक्ष, अपघात विभाग, अत्यानुधिक बाल अतिदक्षता विभाग याची सरकार स्तरावर देखल घेतली गेली. परंतु जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या व्यवस्थेविषयी अनेक तक्रारी सध्या जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. ६ पैकी चार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची पदेही रिक्त होती. २९ प्राथमिक आरोग्य केंद्रात गट अ आणि ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही रिक्त होती. पदे रिक्त असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. याकडे मंत्री रावल लक्ष देत आहेत. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विषयक यंत्रणेविषयी फारशी समाधानकारक स्थिती नाही. मात्र, राज्य सरकाने आता वाढवून दिलेल्या सुविधांमुळे काही स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. धुळे येथील बंद असलेल्या जन्या जिल्हा रूग्णालय जागेत २०० खाटांचे रूग्णालय सुरू होणार आहे. यासाठी केंद्रीयमंत्री सुभाष भामरे यांनी लक्ष घातले आहे. या रुग्णालयासाठी रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने १११ नवीन आरोग्य संस्थाना मंजुरी दिली आहे. त्यात धुळ्याच्या या जुन्या जिल्हा रूग्णालयाला नवसंजिवनी मिळणार आहे. धुळे शहरात मनपाचे सुसज्ज हॉस्पिटल नाही. त्यामुळे जुने जिल्हा रुग्णालय सुरू होणे हे जिल्हावासियांसह शहरवासियांसाठी उपयुक्त ठरणार आहे. खान्देश खबरबातमधील याआधीचे ब्लॉग :खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार