T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर श्रीलंकेच्या संघानं यूएईविरुद्ध विजय मिळवून कमबॅक केलं. मात्र, याचदरम्यान श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आलीय. श्रीलंकेच्या स्टार गोलंदाज दुष्मंथा चामीराच्या (Dushmantha Chameera) पायाला दुखापत झाली असून तो टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय, अशी माहिती क्रिकबझनं दिलीय. दुष्मंथा चमीरा श्रीलंकेचा प्रमुख गोलंदाज असून यूएईविरुद्ध त्यानं उत्कृष्ट प्रदर्शन केलंय.
क्रिकेट वेबसाईट क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला पुन्हा एकदा गंभीर दुखापत झालीय. ज्यामुळं त्याला टी-20 विश्वचषकातून बाहेर पडावं लागलंय. आशिया चषकातही त्याला दुखापत झाल्यानं स्पर्धेला मुकावं लागलं होतं. परंतु, तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचा टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला. या स्पर्धेत त्यानं फक्त दोनचं सामने खेळले आहेत.
ट्वीट-
यूएईविरुद्ध दमदार गोलंदाजी
यूएईविरुद्ध काल गिलॉन्गमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं 79 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेच्या विजयात दुष्मंथा चमीरानं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं 15 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. नामिबियाविरुद्ध सामन्यातही त्याला एक विकेट्स मिळाली होती. पण या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
श्रीलंकेच्या खेळाडूंची दुखापतींशी झुंज
यूएईविरुद्धच्या सामन्यात आपल्या स्पेलचं शेवटचं षटक टाकताना चमीराला दुखापत झाली. श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलका आणि वेगवान गोलंदाज प्रमोद मदुशन हेदेखील फिटनेसच्या समस्येशी झुंजत आहेत. यावर श्रीलंका क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेतंय? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
श्रीलंकेच्या टी-20 विश्वचषकाच्या संघात चार राखीव खेळाडूंचा समावेश
श्रीलंकेच्या टी-20 विश्वचषकाच्या संघात चार राखीव खेळाडू आहेत. ज्यात अशेन बांडरा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चांदीमल आणि नुवानिदु फर्नांडो यांचा समावेश आहे. यापैंकी एखाद्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली जाईल, असं म्हटलं जातंय. अद्याप श्रीलंका क्रिकेट बोर्डानं दुष्मंता चमीरा टी-20 विश्वचषकातून बाहेर झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.