नवी दिल्ली : राहुल द्रविड भारताच्या प्रशिक्षकपदासाठी योग्य असून त्याच्यामध्ये प्रशिक्षकाची पात्रता आहे, असं मत ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू शेन वॉट्सनने व्यक्त केलं आहे.


 

 

द्रविडच्या पात्रतेवर अगोदरपासूनच कसलीही शंका नाही. द्रविडने राजस्थान रॉयल्समध्ये कर्णधार आणि प्रशिक्षकपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. त्या काळात मलाही द्रविडसोबत काम करताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, अशा शब्दात वॉट्सनने प्रशिक्षकपदासाठी द्रविडचं समर्थन केलं आहे.

 

 

द्रविडमध्ये युवा खेळाडू घडवण्याची क्षमता

द्रविडकडे भारताच्या प्रशिक्षकपदाची धुरा दिल्यास ती जबाबदारी तो नक्कीच यशस्वीपणे सांभाळेल यात कसलीही शंका नाही. आयपीएलमधून कर्णधार म्हणून समोर आलेला विराट कोहली आणि द्रविड दोघे मिळून संघासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरतील. द्रविड एक व्यक्ती म्हणून देखील अत्यंत चांगला आहे. द्रविडमध्ये युवा खेळाडूंना समजून मार्गदर्शन करण्याची कला आहे, असं वॉट्सनने सांगितलं.

 

 

भारताचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. पण शास्त्री यांचाही कार्यकाळ संपल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

'प्रशिक्षकपदासाठी द्रविडच योग्य'

अंडर-19 भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे द्रविडसाठी अनेक दिग्गज खेळाडूंनी समर्थन केलं आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर, हरभजन सिंह यांच्यासह अनेकांनी द्रविडच्या नावाचं समर्थन केलं आहे.

 

 

भारतीय संघ लवकरच अनेक महत्त्वाच्या दौऱ्यांवर जाणार आहे. डिसेंबर 2016 पर्यंत भारत वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि इग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.