मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत-इंग्लड दरम्यानच्या कसोटी सामन्यात कॅप्टन विराट कोहलीनं द्विशतकी खेळी रचली आहे. कोहलीच्या या द्विशतकी खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं 7 बाद 558 धावांचा डोंगर रचला आहे. कॅप्टन कोहलीसोबत मैदानात असलेल्या जयंत यादवनेही सुंदर भागिदारी केली आहे. विराट कोहलीचं गेल्या तीन महिन्यांमधील हे सलग तिसरं द्विशतक आहे. मैदानात उतरल्यावर विराटनं कालही अशीच दमदार खेळी केली होती. त्यामुळे कालपासून क्रीडा समिक्षकांनी विराटचं तोंडभरुन कौतुकही केलं होतं.
कर्णधारपदी असलेल्या विराटनं आश्वासक आणि जबाबदार खेळी केल्यानं क्रिकेट चाहते आणि समीक्षकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
या कसोटीत सलामीवीर मुरली विजयनंही 136 धावांची खेळी केली होती. त्यामुळं टीम इंडिया 400 धावांचा पल्ला सहज पार करेल असं वाटत होतं. मात्र, जो रूट आणि आदिल रशीदच्या फिरकीसमोर भारताच्या मधल्या फळीची काहीशी पडझड झाली. सध्या विराटनं 200 धावांचा पल्ला ओलांडला असून जयंत यादव त्याच्या साथीला आहे.