नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच त्याची तुलना भारताचे माजी दिग्गज खेळाडू कपिलदेव यांच्याशी केली जाते. तो कपिलदेव यांची जागा घेऊ शकतो, असा अनेकांना विश्वास आहे. मात्र दुसरा कपिलदेव होणार नाही, असं टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी म्हटलं आहे.


हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना केपटाऊन कसोटीत 93 धावा केल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी तो दुसरा कपिलदेव असल्याचं म्हटलं. या चर्चा केवळ निरर्थक असून दुसरा कपिलदेव होऊ शकत नाही, असं मोहम्मद अझरुद्दीन यांनी म्हटलं आहे.

''दुसरा कपिलदेव होऊ शकत नाही, ही चांगली गोष्ट नाही. दुसरा कपिलदेव तयार करणं कठीण गोष्ट आहे. कारण त्यांनी त्या काळात जी मेहनत केली होती, ती अतुलनीय आहे. कपिलदेव एका दिवसात 20-25 षटकं गोलंदाजी करायचे. आता असं कुणीही करत नाही,'' असंही मोहम्मद अझरुद्दीन म्हणाले.