मुंबई : महाराष्ट्राची लेक असलेल्या 19 वर्षांच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाचा महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. विशेष म्हणजे दिव्या देशमुखनं भारताच्याच अनुभवी आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कोनेरू हम्पीला पराभूत केलं. दिव्यानं जेव्हा ही ऐतिहासिक विजयी चाल खेळली, तेव्हा तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. भारताची मान जगभरात अभिमानानं उंचावणाऱ्या दिव्याच्या कामगिरीचा हा स्पेशल रिपोर्ट.
भारताच्या दिव्या देशमुखने नवा इतिहास घडवला. अवघ्या 19 व्या वर्षी तिने महिला बुद्धिबळ विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ही कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू बनली
टाय ब्रेकरमधील दुसऱ्या अटीतटीच्या रॅपिड गेममध्ये दिव्याने भारताच्याच कोनेरु हम्पीला हरवलं. विजेती बनल्यावर सर्वात आधी दिव्याने थेट आपल्या आईकडे धाव घेतली, आईच्या मिठीत विजेतेपदाचा आनंद साजरा केला.
Divya Deshmukh : बुद्धीबळाच्या जगतात वेगाने प्रगती
जॉर्जियाच्या बाटुमीत भारताच्या दोन कन्या अंतिम सामन्यात आमनेसामने होत्या. हा सामना साधासुधा नव्हता. नागपूरची दिव्या स्वतः गेल्या काही वर्षात बुद्धिबळाच्या जगात वेगाने एक एक पायऱ्या वर चढतेय, कमी कालावधीत ती भारताची दुसऱ्या क्रमाकांची महिला खेळाडू बनली होती.
या वर्ल्ड कप स्पर्धेत तिने जागतिक क्रमवारीत वर असलेल्या एक-दोन नाही तर चार खेळाडूंना हरवत आपलं नाणं किती खणखणीत आहे ते दाखवलं. दिव्यासमोर होती ग्रँडमास्टर, दोन वेळची वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन, दिग्गज खेळाडू कोनेरु हम्पी.
Divya Deshmukh FIDE Womens World Cup : टाय ब्रेकरवर सामना आणि दिव्याचा कस लागला
शनिवारी अंतिम सामना सुरू झाला, 26 आणि 27 जुलै असे दोन दिवस दोन क्लासिक गेम बरोबरीत सुटले. सगळी मदार आजच्या टाय ब्रेकर वर आली. टाय ब्रेकरमध्ये दिव्याकडे पांढऱ्या सोंगट्या होत्या. मात्र अनुभवी हम्पीने तिला थोपवले, पहिला रॅपिड गेम बरोबरीत सुटला.
Koneru Humpy vs Divya Deshmukh : हम्पीची चूक अन् दिव्याचे विजेतेपद
दुसरा गेम बरोबरीत सुटेल अशी स्थिती होती. मात्र हम्पीच्या घड्याळात 35-35 सेकंद बाकी होते. त्या दबावाखाली तिने एक चूक केली आणि दिव्याने त्याचा फायदा उचलला. दिव्याला विजेतेपद समोर दिसत होतं. तिच्याकडूनही चुका झाल्या पण अखेर संयम राखत तिने योग्य चाली खेळल्या. हम्पीने हार मान्य करत रिजाईन केलं आणि दिव्याने विश्वचषक जिंकला.
या विजया सोबतच दिव्याने ग्रँडमास्टर खिताबही पटकावला आहे. ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर बनली. या 88 मध्ये याआधी फक्त 3 महिला होत्या ग्रँडमास्टर आहेत.
- कोनेरु हम्पी
- हरिका द्रोणावली
- वैशाली रमेशबाबू
या तिघींनंतर आज दिव्या देशमुख चौथी ग्रँडमास्टर बनली. यासोबतच तिने कँडिडेट्स स्पर्धेत आपलं स्थान पक्कं केलं. जेवढं दिव्याचं वय आहे त्यापेक्षा जास्त वर्ष कोनेरु हम्पी बुद्धीबळ खेळतेय. जेव्हा कोनेरु हम्पी पहिल्यांदा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनली होती तेव्हा दिव्याचा जन्मही झाला नव्हता. हम्पीने जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गेल्या वर्षी हम्पी दुसऱ्यांदा रॅपिड चॅम्पियन बनली होती. अशा दिग्गज खेळाडूला हरवून दिव्याने किती मोठी कामगिरी केलीय याचा अंदाज येईल.
ही बातमी वाचा: