लातूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ( Mnister Manikrav Kokate) यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील ( Vijay Ghadge) यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना लातुरात घडली होती. या घटनेनंतर छावाचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी ॲम्बुलन्सद्वारे पुण्यात जात अजितदादांची भेट घेतली होती. त्यावेळी अजितदादांनी कृषीमंत्र्यांचा राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मंगळवार पर्यंतची मुदत मागितली होती.
मंगळवारपर्यंतची मुदत उद्या संपणार
मंगळवारपर्यंतची मुदत उद्या संपणार आहे. उद्या राजीनाम्याबाबत निर्णय न झाल्यास राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटना राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली. विजयकुमार घाडगे यांना काल रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर ते लातूर जिल्ह्यातील तावशी ताड या आपल्या मुळगावी परतले आहेत.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देण्याची शक्यता
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी पुण्यात रात्री दोन तास जिजाई येथील निवासस्थानी चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा अजित पवार यांना कळवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणिकराव कोकाटे यांचं सभागृहातील कृत्य आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणाले, या दोन गोष्टींवर प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे. कोकाट हे सातत्याने सरकारला अडचणीत आणत असल्याने आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नसल्याची बैठकीत चर्चा झाली. आज संध्याकाळपर्यंत अजित पवार पक्षातील आपल्या नेत्यांजवळ कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
ऑनलाईन रमी खेळण्याच्या घटनेमुळं कोकाटे अडचणीत
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळं माणिकराव कोकाटे हे सध्या अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत. रमी प्रकरणामुळे (Rummy Video) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची गच्छंती होणार हे आता निश्चित मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या: