Who is Divya Deshmukh : 19 वर्षांची दिव्या देशमुखने सोमवारी (28 जुलै) जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या टाय-ब्रेकरमधील दुसऱ्या रॅपिड गेममध्ये अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत इतिहास रचला. यासह, दिव्या देशमुख वर्ल्ड कप जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला बुद्धिबळपटू बनली आहे.
महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने भारताच्याच अनुभवी आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कोनेरू हम्पीला पराभूत करत हे मानाचे विजेतेपद आपल्या नावावर केलं. अवघ्या 19 वर्षांची असलेल्या दिव्याने जेव्हा ही ऐतिहासिक विजयी चाल खेळली, तेव्हा तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले.
दिव्या देशमुख बुद्धिबळातील नवी चॅम्पियन
या विजयासह दिव्या ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी चौथी भारतीय महिला ठरली आहे. याआधी कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर. वैषाली यांनी ही कामगिरी केली आहे. आपल्या वयाच्या जवळपास दुप्पट वयाच्या, आणि भारतीय महिला बुद्धिबळविश्वात गेल्या काही दशकांपासून अधिराज्य गाजवत असलेल्या कोनेरू हम्पीशी जेव्हा दिव्याने हातमिळवणी केली, तेव्हा तिच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले, त्यावेळी ती आईच्या कुशीत शिरली.
दिव्या देशमुख कोण आहे?
दिव्या देशमुख ही महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील रहिवासी आहे. ती एक महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहे. रॅपिड फॉरमॅटमध्ये तिच्या आक्रमक आणि निडर शैलीसाठी ती विशेष ओळखली जाते. अत्यंत तरुण वयात तिने बुद्धिबळात जे यश मिळवलं आहे, त्याने संपूर्ण देशाचं नाव उज्वल केलं आहे.
दिव्या देशमुखचे आई-वडील काय करतात?
- दिव्याचे आईवडील डॉक्टर तर मोठ्या बहिणीला बॅडमिंटनची आवड आहे.
- दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे, तर आई डॉ. नम्रता यादेखील कधीकाळी खासगी क्लिनिक चालवायच्या.
- दिव्याच्या आई - वडिलांचा खेळाशी संबंध नाही. मात्र आपल्या मुलींनी मैदानावर जावे, अशी त्यांची खूप इच्छा होती. मोठ्या मुलीस बॅडमिंटनमध्ये तर धाकट्या दिव्याला बुद्धिबळाचे प्रशिक्षण वर्ग लावून दिले.
- दिव्या पाचव्या वर्षापासून 'चेस-बोर्ड'वर रमली आहे. चेस खेळताखेळता दिव्याला केव्हा खेळाचा लळा लागला, हे त्यांच्याही लक्षात आले नाही.
दिव्याची सुवर्ण कामगिरी
दिव्या ही नागपूरच्या भवन्स शाळेची विद्यार्थिनी आहे. तिने 2012 मध्ये सात वर्षांखालील गटात पहिले 'नॅशनल टायटल' जिंकले होते. दिव्याला खऱ्या अर्थाने ओळख त्यावेळी मिळावी जेव्हा तिने इराणमधील "आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्य कामगिरी केली. या स्पर्धेत दिव्याने 2 सुवर्णपदकांची कमाई केली, शिवाय दिव्याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेच महिला 'फिडेमास्टर' हा किताबही आपल्या नावे केला. कमी वयात हा बहूमान मिळविणारी दिव्या भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली होती.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आजवर 40 पदकांची कमाई
दिव्या देशमुखने आतापर्यंत जगभरतील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 25 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 ब्रँझपदकांची कमाई केलेली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिच्या नावावर सुवर्ण आणि ब्राँझपदक आहे.
ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन' व तीन वेळा आशियाई विजेती राहिलेल्या दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्मससह बुद्धिबळातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा महिला ग्रॅण्डमास्टर किताब सुद्धा पटकाविलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे, देशविदेशातील अनेक दिग्गज खेळाडूंना तिने पराभूत केले आहे.
बुद्धिबळातील या अद्वितीय कामगिरी आणि योगदानाबद्दल राज्य सरकारने दिव्याला दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
हे ही वाचा -