मुंबई: महेंद्रसिंह धोनी... ज्यानं कर्णधार म्हणून अशी कामगिरी केली आहे की, जी कधीही विसरता येणार नाही. मात्र, याच धोनीला कर्णधार बनवणारा दुसरा तिसरा कुणीही नसून एक मराठमोळा माणूस होता. होय... भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि तत्कालिन निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी पहिल्यांदा 2007 साली T20 विश्वचषकासाठी धोनीची निवड केली होती.
काल धोनीनं अचानक कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या या निर्णयानंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना वेंगसरकर म्हणाले की, 'तेव्हा मी ठरवलं होतं की, T20चं नेतृत्व आम्ही कर्णधार धोनीला सोपवणार. पण त्यावेळी मी त्याला फार ओळखत नव्हतो. त्यावेळी मी ठरवलं की, मला त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. जेव्हा मला समजलं की, धोनी कोलकाताहून मुंबईला चालला आहे त्यावेळी मी देखील माझी फ्लाइट बदलली. कारण, की मला त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलता यावं. तेव्हा त्या फ्लाइटमधील बिझनेस क्लासमध्ये फक्त आम्ही दोघंच होतो. कोलकाताहून मुंबई विमानाला पोहचण्यासाठी किमान अडीच तास लागणारे होते. तेव्हाच मी विचार केला की, एक माणूस म्हणून धोनीला जाणून घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे.'
'पण त्यावेळी माझं आणि धोनीचं फार काही बोलणंच झालं नाही. कारण की, जसं फ्लाइट टेक ऑफ झालं तसा धोनी झोपी गेला. त्यानंतर तो थेट मुंबईलाच उठला. मी त्याला कर्णधार बनवण्याचा विचार करत होतो. पण त्याच्याशी काहीही बोलणंच झालं नाही. हे थोडसं मला विचित्र वाटलं.' अशीही त्यांनी धोनीबाबतची आठवण सांगितली.
'आम्ही धोनीला कर्णधार करण्याचा विचार करत होतो. पण तोवर तो राज्यस्तरावर देखील कर्णधार नव्हता. पण त्याच्या खेळण्याची वृत्ती खूपच सकारात्मक होती. तो मैदानावर ज्या पद्धतीनं वावरायचा त्यानं मी खूपच प्रभावित झालो होतो. मला त्याच्यात एका चांगल्या कर्णधाराचे गुण दिसत होते आणि म्हणूनच आम्ही त्याला कर्णधार म्हणून निवडलं.' असं वेंगसरकर म्हणाले.
धोनीने घेतलेल्या निर्णयाबद्दल वेंगसरकर म्हणाल की, 'हा त्याचा स्वत:चा निर्णय आहे. तो आपल्या आवडीनं क्रिकेट खेळत आला आहे. त्यामुळे तो आपल्याच आवडीनं खेळही सोडेल. हीच या खेळाडूची महानता आहे. जेव्हा दोन वर्षापूर्वी त्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी मला त्याचा निर्णय अजिबात आवडला नव्हता. पण तो पूर्णपणे त्याचा निर्णय होता. केव्हा काय करायचं हे त्याला बरोबर माहिती आहे.' असंही वेंगसरकर म्हणाले.
दरम्यान, धोनीनं जे काही यश मिळवलं त्यामध्ये वेंगसरकर यांच्याही मोलाचा वाटा आहे. मात्र, वेंगसकर त्याचं श्रेय अजिबात घेत नाही.