मुंबई : मानवी शरीरातील एक नवीन अवयवाचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. उदर पोकळीच्या आतील बाजूस हा अवयव आहे. या अवयवाला 'मेसेन्टरी' असं नाव देण्यात आलं आहे. या अवयवाच्या शोधानंतर मानवी अवयवांची संख्या 79 वर पोहोचली आहे.
'द लॅन्सट गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजी अॅण्ड हेपॅटॉलॉजी' या नियतकालिकामध्ये हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
आयर्लंडमधील लिमेरिक विद्यापीठाच्या रुग्णालयात स्वादूपिंड शस्त्रक्रिया करताना डॉ. जे काल्विन काफे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा अवयव दिसला होता. यावर केलेल्या दीर्घ संशोधनानंतर या अवयवला आता मान्यता देण्यात आली आहे.
आतापर्यंत आतडं आणि पोट यांना जोडणारी जी आंत्रपेशी असते, ती वेगवेगळ्या भागांची बनलेली असते, असा मानलं जात होतं. परंतु आंत्रपेशी हा अखंड अवयव असल्याचं संशोधनानंतर स्पष्ट झालं आहे.
वैद्यकशास्त्राचं बायबल समजल्या जाणाऱ्या 'ग्रेज अॅनॉटोमी' या पुस्तकाही या अवयवाचा समावेश केला आहे. यामुळे वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना यापुढे या अवयवाबद्दल शिकवलं जाणार आहे.
या नव्या संशोधनामुळे पोट आणि पचनसंस्थेच्या विकारांवर उपचार करणं सोपं होणार आहे.