पुणे : आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी रायझिंग पुणे सुपरजायंटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सामनाधिकाऱ्यांकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे.


रायझिंग पुणे आणि मुंबई इंडियन्स संघांमधल्या सामन्यादरम्यान धोनीकडून आयपीएल आचारसंहितेचा भंग करण्याचा लेव्हल वनचा गुन्हा घडल्याचं सांगून, या प्रकरणात त्याला सामनाधिकारी मनू नय्यर यांनी ताकीद दिल्याचं आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

या प्रकरणात धोनीकडून नेमकी काय आगळीक घडली, त्याचं स्पष्टीकरण मात्र प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेलं नाही.

मात्र इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर मुंबईचा कायरन पोलार्ड पायचीत असल्याचं अपील पंचांनी फेटाळल्यानंतर, धोनीने पंचांकडे पाहून डीआरएसचा कौल घेण्याची खूण केली होती.

आयपीएलमध्ये डीआरएसचा समावेश नाही. त्यामुळे धोनीने केवळ गंमतीनंच डीआरएसचा कौल घेण्याची खूण केली होती. पण पंचांच्या निर्णयाबाबत गंमतही सहन केली जाणार नाही, हाच इशारा सामनाधिकाऱ्यांनी धोनीला दिलेला दिसतो.

आयपीएलच्या दहाव्या मोसमातील दुसरा सामना काल पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने कर्णधारास साजेशी खेळी करून आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटला मुंबई इंडियन्सवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला.

गहुंजे स्टेडियमवरच्या या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 54 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली. त्यानं अजिंक्य रहाणेच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची, बेन स्टोक्सच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची आणि धोनीच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 44 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

त्याआधी, हार्दिक पंड्यानं अवघ्या 15 चेंडूंत फटकावलेल्या नाबाद 35 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं रायझिंग पुणेला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं.

रायझिंग पुणेनं एक चेंडू आणि सात विकेट्स राखून ते आव्हान पार केलं. पुण्याच्या या विजयात लेग स्पिनर इम्रान ताहिरनंही मोलाची भूमिका बजावली. त्यानं 28 धावांच मुंबईच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं 65 धावांची खेळी करून पुण्याच्या विजयाचा पाया रचला.