यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईवर सलग तीन वेळा मात केलेल्या पुण्याकडे असा खेळाडू आहे, ज्याला गेल्या दहा वर्षात सहा आयपीएलच्या अंतिम सामन्यांचा अनुभव आहे. पुण्याचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आतापर्यंत सहा वेळा आयपीएलच्या सामन्यात खेळला आहे. यावेळी तो सातव्यांदा अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरेल.
आयपीएलच्या इतिहासात पुण्याचा हा केवळ दुसराच मोसम आहे. पण दुसऱ्याच मोसमात पुण्याने फायनलमध्ये धडक मारून आपण आयपीएलचा रायझिंग सुपरजायंट असल्याचं दाखवून दिलं. मुंबईची आयपीएलची फायनल गाठण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईने याआधी 2010, 2013 आणि 2015 साली आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवलं होतं. तसंच 2013 आणि 2015 साली मुंबईने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नावही कोरलं.
धोनी आतापर्यंत सहा वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. एखाद्या मालिकेत एवढ्या वेळा अंतिम सामना खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. त्याने चेन्नई सुपरकिंग्जचं नेतृत्व करताना 2010 आणी 2011 साली विजेतेपदाचा मानही मिळवलेला आहे. गेल्या सहा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनीच्या नावावर 150 स्ट्राईक रेटने 168 धावा आहेत.
यंदाच्या मोसमातही मुंबईने सोळापैकी अकरा सामने जिंकून सर्वाधिक विजय साजरे करण्याचा पराक्रम गाजवला आहे. पण पुणेही मुंबईपेक्षा फार पिछाडीवर नाही. पुण्याच्या खात्यात पंधरापैकी दहा सामन्यांमध्ये विजय आहे. त्याच पुण्याने साखळीतल्या दोन आणि प्ले ऑफच्या क्वालिफायर सामन्यात मिळून मुंबईला तीनपैकी तिन्ही सामन्यांमध्ये हरवण्याची कामगिरी बजावली आहे.
आता विजेतेपदाची लढाई जिंकून, पुण्याकडून झालेल्या त्या तिन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी मुंबई साधणार का, याचीच उत्सुकता आयपीएलच्या चाहत्यांना लागली आहे.