पंढरपूर : विद्यार्थिनींची छेड काढल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल झाल्यामुळे प्राचार्यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील प्रथितयश शिक्षण संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप खडतरे यांच्यावर विद्यार्थिनींशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर खडतरेंनी पंढरपूरमधील स्वेरी इंजिनियरिंग कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. खडतरेंच्या सुसाईडमुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
आत्महत्येपूर्वी प्राचार्य दिलीप खडतरे यांनी तीनपानी चिठ्ठी लिहिली होती. आपल्याला छेडछाड प्रकरणात गोवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.
रविवारी सकाळी नऊच्या सुमारास खडतरे चालत गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनियरिंग कॉलेजच्या आवारात आले. तिथून ते डिप्लोमा विभागाच्या इमारतीवरील चौथ्या मजल्यावर पोहचले. तिथे त्यांनी चप्पल काढून खाली उडी मारली.
कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना आवाज येताच त्यांनी धाव घेतली. खडतरे याना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. खडतरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असल्याची माहिती आहे. पोलिसांना खडतरे यांची सुसाईड नोट, कॉलेजमधील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत.
आपल्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असून त्यांना धमक्या मिळत होत्या. गेली 26 वर्ष प्रामाणिकपणे काम केल्यावर त्यांना गोवण्यासाठी षडयंत्र रचणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली.
छेडछाडीचा आरोप करणाऱ्या मुलींची चौकशी करण्याची मागणी प्राचार्यांच्या पत्नी शोभा खडतरे यांनी केली आहे. आपल्या भावाच्या मृत्यूला शिवसेनेचे कार्यकर्ते व त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या विद्यार्थिनी जबाबदार आहेत. सर्वांची चौकशी करण्याची मागणी त्यांचे भाऊ अनिल खडतरे यांनी केली.
शनिवारी प्राचार्य दिलीप खडतरे यांच्यावर त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी छेडछाडीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने प्राचार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
छेडछाडीची माहिती समजताच युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य खडतरे याना त्यांच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून बाहेर काढून काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल होण्याची माहिती कळताच खडतरे सांगोल्यात पसार झाले होते.
पोलिस त्यांचा शोध घेत होते, मात्र रविवारी सकाळी त्यांनी पंढरपूरमध्ये आत्महत्या केली. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात खडतरे कुटुंबीयांनी पंढरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्राचार्य दिलीप खडतरेंची सुसाईड नोट :