मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज माइक हसी सध्या भारतातील तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये समालोचन करत आहे. याचवेळी एका सामन्यात समालोचन करताना धोनी 2019च्या विश्वचषकात खेळल असं वाटतं का? या प्रश्नावर त्यानं उत्तर दिलं आहे.


आयपीएलमधील सुरुवातीच्या हंगामात हसी चेन्नई सुपर किंग्स संघात होता. त्यामुळे या संघातील खेळाडूंशी त्याचं जवळचं नातं आहे. टीएनपीएलच्या एक सामन्यात समालोचन करताना हसी म्हणाला की, 'निवृत्ती कधी घ्यायची हे धोनीला ठरवू दे. त्याला जेव्हा वाटेल तेव्हाच तो निवृत्ती निर्णय घेईल. जर त्याला वाटत असेल की आपण आगामी विश्वचषक खेळू शकू तर, त्यावर कुणालाही शंका घेण्याचं कारण नाही.'

'धोनी एक प्रामाणिक खेळाडू आहे. जर त्याला वाटलं की, आपण विश्वचषक संघात योगदान देऊ शकत नाही तर तो स्वत:च क्रिकेटला अलविदा करेल.' पण हसीच्या मते, धोनी आजही सर्वात फीट खेळाडू आहे.

धोनीशिवाय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक करताना हसी म्हणाला की, 'मला नेहमीच विराटचं नेतृत्व आवडतं. विराट आणि रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात समानता दिसते. कोहली नेहमीच रिकीप्रमाणे विजयासाठी आसुसलेला असतो.'

माइक हसीनं ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत 6 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याच्या नावावर 5 हजार धावा जमा आहेत.