पुणे : चुरशीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी मात केली. विजय शंकर आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या भागीदारीने दिल्लीच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या, मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीला पाच बाद 198 धावांवरच रोखलं.


कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या विजयाचं श्रेय सलामीवीर जोडीने केलेल्या भागीदारीला दिलं. धोनी सध्या पाठीच्या आजाराने त्रस्त आहे. मात्र सध्या आराम करण्यासाठी वेळ नसल्याचं तो म्हणाला. सामन्यानंतर बोलताना त्याने याबाबत माहिती दिली.

''पाठीच्या आजारामुळे जास्त काही केलं जाऊ शकत नव्हतं. कारण, आराम करण्यासाठी सध्या जास्त वेळ नाही. त्यामुळे मी सरावामध्येही जास्त सहभाग घेतला नव्हता. पण टी-20 मध्ये वर्कलोड जास्त नसतो. त्यामुळे सगळं मॅनेज होऊ शकलं. आमच्यासाठी एक चांगली सुरुवात महत्त्वाची होती. धावांची नाही, तर सलामीवीर जोडीची भागीदारी गरजेची होती,'' असं धोनी म्हणाला.

धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. त्याने 22 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची स्फोटक खेळी केली.

''मी स्वतःला प्रमोट केलं आणि वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो. तुम्ही आठव्या किंवा दहाव्या षटकात फलंदाजीसाठी उतरता, तेव्हा चांगलं वाटतं. कारण, यावेळी गोलंदाजालाही माहित नसतं, की तुम्ही कधी मोठा शॉट खेळणार आहात,'' असंही धोनी म्हणाला.

''परदेशी फलंदाजाला सलामीला पाठवण्याची गरज आहे, असं खेळपट्टी पाहून वाटत होतं. सॅम बिलिंग्सला आरामाची गरज होतीच. शिवाय अंबाती रायडूही मधल्या फळीतला फलंदाज आहे आणि फफ डू प्लेसिस सलामीवीर फलंदाज असल्याने आमचं काम आणखी सोपं झालं. रायडूमध्ये कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची क्षमता आहे, असं म्हणत त्याने कौतुकही केलं.