मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या मते, भारताचा महान फलंदाज महेंद्रसिंह धोनी हा 2023चा देखील विश्वचषक खेळू शकतो. तेवढी क्षमता त्याच्यात आहे. असं म्हणत क्लार्कनं धोनीचं कौतुक केलं.


धोनी 2019चा विश्वचषक खेळू शकेल का? या प्रश्नावर बोलताना क्लार्कनं ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी क्लार्क म्हणाला की, 'तुम्ही मला हे नका विचारु की धोनी 2019चा विश्वचषक खेळू शकतो की नाही. तो 2023चा विश्वचषक देखील खेळेल.'

2011च्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषक पटकावला होता. सध्याही धोनी फॉर्मात आहे. नुकत्यातच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे धोनीनं त्याची चुणूक दाखवली आहे. मोक्याच्या क्षणी 79 धावा करुन त्यानं संघाला तारलं होतं. त्याच जोरावर टीम इंडियानं पहिल्या वनडेत कांगारुंवर विजय मिळवला.

याआधी श्रीलंका दौऱ्यातही धोनीनं वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचंही म्हणणं आहे की, त्यांना विश्वचषकाच्या संघात धोनीची गरज आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या देखील धोनीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.