अहमदनगर : मुसळधार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या अरणगावमधला पिंपळडोह हा तलाव काल रात्री अचानक फुटल्यानं तब्बल 32 जण पुरात अडकले होते. पण  आता या सर्वांची सुटका करण्यात आली आहे.


या तलावाच्या पाण्यानं वाळूंज आणि पारगाव या दोन गावांना आपल्या कवेत घेतलं होतं. सुरुवातीला सैन्याच्या जवानांनी या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बोट नसल्यानं त्यांना बाहेर काढण्यात यश आलं नाही.

यानंतर एनडीआरएफचं एक पथक इथं दाखल झालं आणि त्यांनी पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढलं. सध्या सगळे गावकरी सुरक्षित असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये बरीच घबराट पसरली होती. पण बचाव पथकाची तात्काळ मदत मिळाल्यामुळे सुदैवानं कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.