नवी दिल्लीः न्यूझीलंडला कसोटीत व्हाईट वॉश दिल्यानंतर टीम इंडिया कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात वन डे खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या या 900 व्या ऐतिहासिक वन डेत धोनीला मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारताकडून वन डेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याखालोखाल धोनीचा नंबर लागतो. सचिनने वन डेत 195 षटकार मारले आहेत. तर धोनीने 192 षटकारांसह सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
न्यूझीवंडविरुद्धच्या पाच वन डेच्या सीरीजमध्ये धोनीला षटकारांचं द्विशतक मारण्याची संधी आहे. केवळ 8 षटकार मारल्यास धोनी ब्रेंडण मॅक्युलमच्या 200 षटकारांच्या विक्रमाची बरोबरी साधून चौथ्या स्थानावर येईल.
वन डेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने 351 षटकार लगावले आहेत. श्रीलंकेचा सनथ जयसूर्या 270 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर 238 चौकारांसह ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे.
षटकारांशिवाय धोनीला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. यापासून धोनी केवळ 82 धावांनी दूर आहे. धोनीने या मालिकेत 82 धावा केल्यास 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण होईल. असं झाल्यास धोनी सर्वाधिक धावा बनवणारा तिसरा विकेटकीपर असेल.