नवी दिल्ली : भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी शिवसेना आग्रही असल्याचे दिसून येते आहे. "प्रणव मुखर्जी हे देशाला लाभलेले सर्वोत्तम राष्ट्रपती आहेत.", असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निवृत्तीनंतरच्या निवासस्थानासाठी हालचाली सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हे विधान महत्त्वाचं मानले जात आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

प्रणव मुखर्जी हे देशाला लाभलेले सर्वोत्तम राष्ट्रपती आहेत, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले. त्याचसोबत, राऊत पुढे म्हणाले, "राष्ट्रपतीपदाबद्दलचा कुठलाही निर्णय एनडीएने एकतर्फी जाहीर करू नये. सर्व पक्षप्रमुखांशी चर्चा करून मगच नाव जाहीर व्हावं. नाव तुम्हीच ठरवून जाहीर कराल तर आम्हाला चालणार नाही." संजय राऊत यांचं हे विधान म्हणजे भाजपला एकप्रकारे इशाराच आहे.

शिवसेनेचे खासदार लवकरच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. प्रणव मुखर्जींच्या निवृत्तीनंतरच्या निवासस्थानाच्या हालचाली सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आलेलं हे विधान आणि सेना खासदार राष्ट्रपतींची घेणार असलेली भेट, हे सारं महत्त्वाचं मानलं जात आहे.

दरम्यान, मागच्या निवडणुकीतही शिवसेनेने भाजपच्या भूमिकेला फाटा देत वेगळी भूमिका घेऊन प्रणव मुखर्जींनाच राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेब ठाकरेंची 'मातोश्री'वर येऊन भेटही घेतली होती.