कोलकाता: टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या दुखापतीनं उचल खाल्ली असून, कोलकात्याच्या तिसऱ्या वन डे सामन्यातून त्याला वगळण्यात येण्याची चिन्हं आहेत. शिखर धवनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही वन डे सामन्यांमध्ये सूर गवसलेला नाही. त्यात धवनच्या डाव्या अंगठ्यातल्या दुखापतीनं उचल खाल्ली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना त्याच्या डाव्या अंगठ्यात किरकोळ फ्रॅक्चर झालं होतं. ही दुखापत धवनला त्रास देत असल्यानं त्यांना वैद्यकीय सल्ल्यासाठी कोलकात्यात दाखल होताक्षणी थेट रुग्णालयात धाव घेतली.
धवन कोलकात्याच्या तिसऱ्या वन डेत खेळू न शकल्यास, त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेला अंतिम संघात संधी मिळू शकते. भारत अ संघाकडून खेळताना, अजिंक्यनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात 91 धावांची खेळी केली होती.